Rohit Sharma Fat Comment Controversy : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या फिटनेसवर आणि नेतृत्वावर टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद (Shama Mohamed) यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू अतुल वासन (Atul Wassan) यांनी त्यांच्या विधानावर टीका करत म्हटले की, “शमा मोहम्मद यांना क्रिकेटचा पुरेसा अभ्यास नाही. रोहित शर्मा हा विश्वचषक विजेता कर्णधार आहे. सध्या तो संघाचे नेतृत्व करत आहे आणि अशा वेळी त्याच्यावर टीका करणे योग्य नाही.”
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांची तीव्र प्रतिक्रिया
Rohit Sharma Fat Comment : बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनीही मोहम्मद यांच्या विधानाचा निषेध केला. त्यांनी म्हटले, “संघ चांगली कामगिरी करत असताना अशा प्रकारची टीका अयोग्य आहे. ही वेळ भारतीय संघाला पाठिंबा देण्याची आहे, संघावर टीका करण्याची नाही.”
काँग्रेसने घेतला काढता पाय, भाजपने साधला निशाणा
या वादानंतर काँग्रेसने शमा मोहम्मद यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली. पक्षाच्या प्रसार माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेड़ा यांनी स्पष्ट केले की, “शमा मोहम्मद यांचे वक्तव्य पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी संबंधित नाही.” त्यांना यापुढे अशा विधानांबाबत अधिक जबाबदारीने वागण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
🔴 हेही वाचा 👉 शमा मोहम्मद यांना रोहित शर्मावरील पोस्ट तातडीने हटवण्याचा काँग्रेसचा आदेश.
दरम्यान, भाजपने या संधीचा फायदा घेत काँग्रेसवर निशाणा साधला. भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी टोला लगावत म्हटले, “राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 90 निवडणुका हरल्या आहेत. अशा पक्षाचे नेते रोहित शर्माच्या नेतृत्वावर टीका करत आहेत. टी-20 विश्वचषक जिंकणे यांना कमीपणाचे वाटते, पण दिल्लीतील पराभवाचे त्यांना काहीच वाटत नाही!”
शिवसेनेचा रोहित शर्माला पाठिंबा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी रोहित शर्माच्या समर्थनार्थ ट्वीट केले. त्या म्हणाल्या की, “मी क्रिकेटची मोठी चाहती नाही. पण एवढे मात्र नक्की सांगू शकते की, रोहित शर्मा कितीही जाड असो, त्याने संघाला मोठ्या उंचीवर नेले आहे. त्याचे काम आणि त्याची बांधिलकी महत्त्वाची आहे. आता फक्त विजेतेपद मिळवायचे आहे, चॅम्पियन!”
🔴 हेही वाचा 👉 देशाची प्रतिमा मलीन होते… रोहित शर्माच्या ‘फॅट-शेमिंग’ वादावर प्रशिक्षक दिनेश लाड यांची तीव्र प्रतिक्रिया.
रोहित शर्माच्या नेतृत्वावर सुरू झालेला हा वाद आता राजकीय रंग घेत आहे. काँग्रेसच्या नेत्या शमा मोहम्मद यांच्या वक्तव्यावर टीकेची झोड उठली असली, तरी भाजप आणि शिवसेनेसह अनेक राजकीय नेते रोहितच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. आता आगामी सामन्यात रोहित शर्मा आपल्या कामगिरीने या टिकाकारांना उत्तर देतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 ‘या’ नेत्याने केली रोहित शर्माला संघातून वगळण्याची मागणी.